वर्धेतील विकास भवन येथे फार्मर कप 2024 अंतर्गत नियोजन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांच्यासह मुख्य मार्गदर्शक म्हणून पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ सोबतच उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, तहसीलदार रमेश कोळपे, विस्तार अधिकारी देवतळे, वैद्यकीय जनजागृती मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, मिशन समृद्धीचे किशोर जगताप, पानी फाऊंडेशन विभागीय समन्वयक भूषण कडू उपस्थित होते.
फार्मर कप 2024 साठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना सहभागी केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी फाउंडेशनचे आभार मानले. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक गटातून पाच शेतकऱ्यांनी सहभागी होऊन ही गटशेतीची चळवळ जिल्ह्यामध्ये मोठी करण्याचा प्रयत्न करु. जिल्हा प्रशासन पाणी फाऊंडेशन व शेतकऱ्यांना यासाठी आवश्यक सहकार्य करेल, असे पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले. तर डॉ. अविनाश पोळ यांनी फार्मर कप व गटशेतीचे महत्व सांगितले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचे असल्यास एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून काम करण्याची गरज आहे. यावेळी खरांगणा येथील स्वावलंबी शेतकरी गट व संत काळे महाराज शेतकरी गटाने आपले अनुभव कथन केले. या गटाने आपल्या दोन वर्षाचा गटाचा प्रवास सांगितला. सर्वांनी एकत्र येऊन समस्यांचा सामना कसा केला पाहिजे हे सांगितले.
भूषण कडू यांनी प्रास्ताविकाद्वारे पानी फाउंडेशनचा प्रवास विषद केला. पाणी फाऊंडेशन फार्मर कपच्या माध्यमातून गटशेतीची चळवळ तयार करत आहे. या कपसाठी राज्यात केवळ वर्धा संपूर्ण जिल्हा घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेला वर्धा तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, उमेदच्या समूह संसाधन व्यक्ती, कृषी सखी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते